Tuesday, 10 September 2019


बाप्पा,ज्या दहा दिवसांची वर्षातले ३५४ दिवस वाट पाहत होतो, मागचा एक महिना त्याची तयारी करत होतो त्याच दहा दिवसांमधला आज चा शेवटचा दिवस. काय सांगू तुला, वर्षभरात कशाची  एवढी आतुरतेने वात पाहत नाही तेवढी तुझ्या येण्याची पाहतो रे मी. तू ज्या दहा दिवसांत येतोस तेच खरे आमचे जगण्याचे दिवस असतात. ते सकाळ संध्याकाळी कानावर पडणारे आरती चे आणि मंत्रपुष्पांजली चे सूर, त्यानंतर मिळणारा प्रसाद, अनेक गोष्टी. तुझ्या येण्याची तयारी मंडळात काही महिने  आधी सुरु तर झालेलीच असते पण घरी पण मी, आई, बाबा तुझ्या आगमनाची तयारी महिनाभर आधीपासून करीत असतो. त्यामागे फक्त एकच कारण आहे , ते म्हणजे तुझ्यावर असलेल प्रेम बाकी काही नाही. तू जरी वर्षभर समोर नसलास तरी सोबत मात्र नेहमी असतोस. तुला कधी काही मागायची गरज देखील कधी तू पडू देत नाहीस. कारण मला काय हवाय ते आधीपासून च तुला माहित असत आणि ते माझ्यापर्यंत पोचत करायची सोय तू आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे मागच्या वर्षी लवकर ये हे मागितलेल तू आधीच पूर्ण करून ठेवल होतस. तब्बल दहा दिवस लवकर आलास तू ह्यावेळी. भारी वाटलं.
मग पुढचे दहा दिवस मागे पुढे पहायचं नाही, डायेट तर सोडूनच द्यायचं, सकाळी, संध्याकाळी आरती चे मंत्रमुग्ध करणारे स्वर, खाण्याची रेलचेल, महालक्ष्मी असताना सगळ्या नातेवाइकान्सोबत होणारी मजा, मंडळात होणार्या स्पर्धा, तिथली मजा पूर्ण enjoy करतो आम्ही.
पण काल रात्री शेवटच्या दिवशीची आरती करताना राहावल नाही, नकळत डोळे पाणावले, जे मागचे १० दिवस मी तुला अनुभवत होतो ते अचानक उद्या संपणार आहे ह्याची जाणीव झाली. ते तुझ्यासमोर हात जोडून बसण, रात्री तुझ्यासोबत एकाच खोलीत झोपण, मनातल्या मनात तुझ्याशी गप्पा मारण हे सगळ संपणार कि रे.  बेड वर झोपताना तुझी एका बाजूने दिसणारी मूर्ती, आणि जग इकडच तिकडे झाल तरी माझा बाप्पा काय माझी साथ सोडणार नाही हि कल्पनाच मनाला सूख देऊन जाते, मग कसली चिंता नाही निश्चिंत होऊन झोपी जायचं आणि सकाळी परत तुझ्या सेवेत रुजू व्हायचं एवढाच काय तो माझा दिनक्रम. घर झाडून घेणे, फरशी पुसणे, कपड्यांच्या निट घड्या घालून जागेवर ठेवणे असली काम वर्षभर कधीही न करणारा मी ह्या दहा दिवसांत मात्र मन लावून करतो. कुठून उर्जा येते माहित नाही, पण रात्री उशिरा झोपून सकाळी पुन्हा लवकर उठायचं हे कधी मला आयुष्यात जमणार नाही अस वाटत पण ह्या दहा दिवसात ते हि जमून येत. हि तुझीच किमया नाही का.
तुझ्यासाठी हार करायला बाबांना मदत करायची,दुर्वा निवडून त्याच्या जुड्या बनवायच्या, बाप्पाच्या उत्सवाची, सजावटीची तयारी बाबांसोबत करायची हे किती मोठ सुख आहे ह्याची कल्पना देखील कुणी करू शकणार नाही. आयुष्यात कधी मिळणार नाही अशी अनुभूती तू देऊन जातोस. खर तर जात कुठेच नाहीस फक्त तुझ मूर्त रूप कायम डोळ्यासमोर नसत. पण माझ्या  मनात तुझ्यासाठी नुसत मखर नाही तर आक्खं घर च आहे त्यामुळे डोळ्यासमोर नसलास तरी मनात मात्र वर्षभर असतोस. असा एक दिवस नाही कि तुझ्या नावानी मी दिवसाची सुरुवात केली नाही. कायमस्वरूपी माझ्या सोबत तूच तर आहेस. तुझ्याच भरोश्यावर तर हे जीवन चाललंय.
असो तू जाताना डोळे तर दरवर्षीच पाणावतात, तू पुढच्या वर्षी येणार आहेस हे पक्कं माहित असून सुद्धा तू आत्ता जोतोयस हि भावना जास्त दुखी करणारी असते. पण ते नाहीका डायेट करताना त्रास होतोच पण रविवारी जे cheat meal खायला मिळणार असत त्याकडे बघून आपण तो आठवडा डायेट करून ढकलतो आणि cheat meal मात्र मनसोक्त enjoy करतो आणि पुन्हा पुढच्या cheat meal च्या आशेनी पुढचा आठवडा डायेट करायला सज्ज होतो.तसच जे प्रेम तू  दहा दिवस दिल त्याच्याच जोरावर पुढच पूर्ण वर्ष आता आम्ही आनंदानी जगू शकू. आणि पुढच्या वर्षी तुझ्या येण्याची वाट पाहू शकू. एकच म्हणीन, जे काही वर्षभर माझ्याकडून चुकल असेल ते सुधारण्याची संधी दे, सर्वांशी चांगल वागण्याची बुद्धी दे.

 तू आलास, आमच्यासोबत राहिलास, आम्हाला उर्जा दिलीस. तू आलास आणि आमच्या आयुष्याचं सोनं करून गेलास.

-प्रणव होशिंग


No comments:

Post a Comment